Home Cities जळगाव एसटी महामंडळाच्या ३७ वर्षांच्या सेवेला सलाम; आर. के. पाटील यांचा जळगावात कृतज्ञता...

एसटी महामंडळाच्या ३७ वर्षांच्या सेवेला सलाम; आर. के. पाटील यांचा जळगावात कृतज्ञता सोहळ्यात गौरव

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) तब्बल ३७ वर्षे प्रदीर्घ सेवा बजावणारे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष आर. के. पाटील यांच्या सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन जळगाव येथील संतबाबा हरदासराम समाज कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या सोहळ्यास राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कार्याचा गौरव करत एसटी महामंडळ हे आशिया खंडातील अग्रगण्य महामंडळ असून ते राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असल्याचे सांगितले. समाजातील सर्व जाती-धर्म आणि विविध स्तरातील नागरिकांना सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य एसटी कर्मचारी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. एसटी महामंडळ ही महाराष्ट्राची केवळ जीवनवाहिनी नसून रक्तवाहिनी आहे, असे सांगत मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये एसटी महामंडळाचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

आर. के. पाटील यांनी एसटी महामंडळात ३७ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत आपल्या कर्तव्याबरोबरच कामगारांच्या प्रश्नांसाठीही योगदान दिले. त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आर. के. पाटील यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आर. के. पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

या कृतज्ञता सोहळ्यास खासदार स्मिता वाघ, माजी परिवहन मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी परिवहन मंत्री गुलाबराव देवकर, चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे उर्फ राजूमामा, महापौर दीपमाला काळे, पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, माजी उपमहाव्यवस्थापक सोपानराव नाबदे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे माजी स्वीय सहाय्यक माधव देवधर, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे उपाध्यक्ष किरण बिडवे, संघटक सचिव सुभाष जाधव, सेवानिवृत्त कर्मचारी युनियनचे गुलाब शेख, सुरेश चांगरे, गोपाल पाटील यांच्यासह एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर. के. पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित या सोहळ्यात आजी-माजी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला. एसटी महामंडळातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सभासदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी. बी. महाजन यांनी केले.


Protected Content

Play sound