गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने घराला आग; संसारोपयोगी वस्तू जळून खाक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील गणेश कॉलनी परिसरातील घरात गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने घरात आग लागल्याची घटना मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. महिलेने जीवाची पर्वा न करता धगधगत्या आगीत शिरून गॅस सिलेंडरचा कॉक बंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या आगीत कुटुंबातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  खाद्य पदार्थांची गाडी लावून व्यवसाय करणारे गणेश प्रजापत हे गणेश कॉलनीमध्ये भाडे तत्वावर घेतलेल्या घरात राहतात. मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास व्यवसायाच्या ठिकाणी जाण्याची तयारी करीत असताना गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले होते. त्यावेळी अचानक गॅस सिलिंडरने पेट घेतला. काही क्षणातच इतर साहित्यानेही आगीत सापडले व ही आग संपूर्ण खोलीत पसरली. त्यावेळी प्रजापती यांच्या पत्नी केशर प्रजापत यांनी थेट आगीमध्ये धाव घेत सिलिंडरचा कॉक बंद केला. अन्यथा या आगीत सिलिंडर फुटून या घरासह इतर घरांनाही धोका निर्माण झाला असता. मात्र वेळीच या महिनेने धाडस दाखविल्याने मोठा अनर्थ टळला.  आग लागल्यानंतर घरासमोर राहणारे दिलीप शिंपी यांनी अग्नीशमन विभागाला माहिती दिली. त्या वेळी तेथे एक बंब दाखल झाला व आग आटोक्यात आणून सिलिंडर बाहेर काढण्यात आले. यावेळी अग्निशमन विभागाचे चालक देविदास सुरवाळे, संतोष तायडे, फायरमन भगवान पाटील यांनी सहकार्य केले. या आगीत रॅकवर ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या बरण्यांसह भांडे, कपडे व इतर साहित्यही जळून खाक झाले. यामुळे या कुटुंबीयांचा संसार उघड्यावर आला आहे.

Protected Content