उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तरसोद येथे उधारीने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून तरूणाला दोन जणांनी लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सोमवारी २ ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की,  रुकेश सुनील इंगळे (३०, रा. तरसोद ता.जि.जळगाव) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावातीलच दोन जणांना पैसे उधार दिलेले होते. १२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता ते दोघे दिसले, त्यावेळी रूकेश इंगळे यांनी त्यांना उधार दिलेले पैसे परत मागितले. त्याचा त्यांना राग आल्याने दमदाटी करीत शिवीगाळ केली. शिवीगाळ का करतात, असे त्यांना विचारले असता एका जणाने इंगळे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून दुसऱ्याने रॉडने पायावर मारुन दुखापत केली. यात रक्तस्त्राव झाल्याचे पाहून दोघेही पळून गेले. त्यावेळी जखमीच्या वडिलांनी व गावातील काही जणांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध सोमवारी २ ऑक्टोबर दुपारी ३ वाजता रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय जाधव करीत आहेत.

Protected Content