भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील टाहाकळी येथे अवैधरित्या हातात तलवार घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला वरणगाव पोलिसांनी सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली असून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील टाहाकळी येथे संशयित आरोपी आकाश प्रल्हाद सोनवणे (वय-२३) हा तरुण बेकायदेशीरित्या हातात तलवार घेऊन गावात दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पोलिसांनी सोमवार २ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित आरोपी आकाश सोनवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आकाश प्रल्हाद सोनवणे रा. टाहाकळी ता. भुसावळ यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नवीद अली सादिक अली सय्यद करीत आहे.