Home Cities मुक्ताईनगर आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुक्ताईनगरमध्ये १ हजार विद्यार्थ्यांची भव्य ‘मानवी साखळी’

आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुक्ताईनगरमध्ये १ हजार विद्यार्थ्यांची भव्य ‘मानवी साखळी’

0
17


मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात तब्बल १ हजार विद्यार्थी आणि १०० शिक्षक-शिक्षिकांनी एकत्र येत एक अतिशय भव्य आणि शिस्तबद्ध ‘मानवी साखळी’ साकारली. नाथाभाऊंनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या तसेच शिक्षण क्षेत्राच्या विकासात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत देखण्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने साकारण्यात आलेली ही मानवी साखळी संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यासह शैक्षणिक वर्तुळात प्रचंड कौतुकाचा व चर्चेचा विषय ठरली आहे.

सकाळी विद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर सर्व विद्यार्थी आणि शिक्षक अत्यंत उत्साहाने एकत्र जमले होते. विद्यार्थ्यांनी मैदानावर विशेष रचनेमध्ये बसून सामूहिक कवायती करत ‘J E SCHOOL, नाथाभाऊ @75’ अशा अक्षरांची भव्य मानवी साखळी साकारली. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे तसेच सौ. शारदाताई खडसे चौधरी यांनी मैदानावर आवर्जून उपस्थिती लावून या विहंगम दृश्याची पाहणी केली व सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. या वेळी बोलताना ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमधील ही शिस्त आणि प्रेम पाहून मन भारावून गेले आहे. नाथाभाऊंच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाला विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दिलेल्या या अनोख्या मानवंदनेबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

या मानवी साखळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आमदार खडसे यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने शुभेच्छा दिल्या. मैदानावर उपस्थित विद्यार्थ्यांचा दांडगा उत्साह आणि शिस्तबद्धता यामुळे संपूर्ण परिसराला एखाद्या महोत्सवाचे रूप आले होते. शिक्षण क्षेत्राकडून नाथाभाऊंना मिळालेली ही आजवरची सर्वात मोठी आणि आगळीवेगळी मानवंदना ठरली आहे. या भव्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांच्यासह क्रीडा व कला शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मैदानावर शिस्त सांभाळण्यासाठी परिश्रम घेतले. हा नयनरम्य सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पालकांनीही मोठी गर्दी केली होती.


Protected Content

Play sound