



जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणरायाच्या आगमन मार्गावरील रिंगरोडच्या दुरवस्थेबाबत ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा जोरदार इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने गणेश मंडळांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. या समस्येचे गांभीर्य ओळखून ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने वृत्त प्रसिद्ध करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या बातमीची तातडीने गंभीर दखल घेत जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाने रिंगरोडवरील रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
शहरातील निम्म्याहून अधिक सार्वजनिक आणि घरगुती गणेश मंडळे रिंगरोडवरील गणेशमूर्ती कारखान्यांमधूनच श्रींच्या मूर्ती अत्यंत उत्साहात घेऊन जातात. मात्र, रिंगरोडवरील गणेशमूर्ती कारखाना ते गोकूळ स्वीट चौक या मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली होती. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना या खड्ड्यांमुळे मूर्ती आणताना मोठी दुर्घटना घडण्याची किंवा मूर्तीला हानी पोहोचण्याची भीती कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. हा मार्ग गणेशोत्सवाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातो.
गणेश भक्तांची आणि मंडळांची हीच अडचण ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने ठळकपणे मांडून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. बातमी प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासन हरकतीत आले आणि त्यांनी तातडीने पथक तैनात करून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. सध्या या मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता समपातळीत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ऐन सणाच्या तोंडावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने शहरातील गणेश मंडळे आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’चे विशेष आभार मानले जात आहेत.



