चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशाच्या सीमांचे रक्षण करताना जळगाव जिल्ह्याने आपला आणखी एक सुपुत्र गमावला आहे. चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील जवान वैभव आण्णा मांडोळे यांना पश्चिम बंगालमध्ये सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले. आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वैभव मांडोळे हे बीएसएफच्या ११ बटालियनमध्ये कार्यरत होते. ४ एप्रिल रोजी देशसेवेचे कर्तव्य पार पाडत असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांचे पार्थिव गावात येताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. घराघरातून ‘वीर जवान वैभव मांडोळे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वात हृदयद्रावक क्षण तेव्हा आला, जेव्हा त्यांच्या चिमुकल्याने रडत रडत “पप्पा ओ पप्पा, उठा ना!” अशी हाक मारली. आपल्या पित्याला शेवटचे पाहण्यासाठी त्याने दिलेल्या या आर्त हाकेने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काळजाचे पाणी केले. लष्करी इतमामात हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. या महान पुत्राच्या जाण्याने खडकी बुद्रुक गावासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.



