यावल दरोड्यातील पाचव्या संशयिताला भुसावळातून घेतले ताब्यात

यावल प्रतिनिधी । यावल प्रतिनिधी । यावल शहरात सराफा दुकानात टाकलेल्या दरोड्या प्रकरणातील आज आणखी एका संशयित आरोपीला भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.  हा पाचवा संशयित आरोपी आहे.

रुपेश उर्फ भनभन अशोक चौधरी (41, श्रीराम नगर, भुसावळ) असे अटक केलेल्या पाचव्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला आज रविवारी सकाळी राहत्या घरातून मुसक्या आवळल्या आहे. आतापर्यंत एकूण पाच संशयित आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. 

याबाबत वृत्त असे की, यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफा बाजारातील व्यवसायीक बाजीराव कवडीवाले या सराफा दुकानात दुकान मालक तथा शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले हे ७ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या दुकानात असतांना चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून सुमारे १२ लाख रुपयांचे सोन्याचे दागीने घेवुन पळाले होते. याप्रसंगी काही धाडसी युवकांनी त्यांना पकडण्याचा देखील प्रयत्न केला तरी देखील ते दरोडेखोर आपल्या कडील पल्सर या मोटरसायकलने पळुन जाण्यात यशस्वी ठरले होते. भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे यावलसह परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या पाच जणांना केली अटक

यावलमधील दरोड्याप्रकरणी आतापर्यंत निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (32, रा. रामनगर ता.कन्नड, जि.औरंगाबाद ह.मु. कांदीवली पुर्व मुंबई), यश विजय अडकमोल (22, रा.बोरावल गेट, यावल), चंद्रकांत उर्फ विकी सोमनाथ चाले (लोणारी, रा.मोहित नगर, भुसावळ) या आरोपींना अटक करण्यात आली होती तर शनिवारी मुकेश भालेराव (भुसावळ) याच्या अटकेनंतर रविवारी पहाटे रुपेश उर्फ भनभन अशोक चौधरी (41, श्रीराम नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली. एकूण अटकेतील आरोपींची संख्या पाच झाली असून या गुन्ह्यात सुनील अमरसिंग बारेला (रा.गोर्‍यापाडा, ता.चोपडा) हा अद्याप फरारच आहे. त्याचाही शोध सुरू आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, श्रीकृष्णा देशमुख, योगेश माळी, परेश बिर्‍हाडे यांनी कारवाई केली. 

Protected Content