जातीय जनगणना गरजेची नाही; संघाची भूमिका जाहीर

नागपूर-वृत्तसेवा | बिहारमध्ये जातीय जनगणना झाल्यानंतर महाराष्ट्रातही जातीय जनगणनेच्या मागणीने जोर धरला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जातीय जनगणना करण्याची मागणी केली आहे. भाजपही जातीय जनगणनेच्या बाजूने आहे. त्यामुळे राज्यात जातीय जनगणना होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याने या मागणीने अधिकच जोर धरला आहे. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र जातीय जनगणनेवरून वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रेशीमबागेत भाजप आणि शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांसाठी बौद्धिक वर्गाचं आयोजन केलं होतं. संघाचे विदर्भ सरसंघचालक श्रीधर घाडगे यांनी यावेळी आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी घाडगे यांनी जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका स्पष्ट केली. संघाचं शताब्दी वर्ष येत आहे. या निमित्ताने संघाला समाजात पाच प्रकारचे बदल व्हावे हे अपेक्षित आहे. ती पंचसूत्री आज आमदारांना सांगितली आहे. एकीकडे आपण जातीय विषमता नष्ट व्हावी म्हणतो तर दुसऱ्या बाजूला काही लोक जातीय गणनेची मागणी करतात. जर जातीय विषमता नष्ट करायची असेल तर जातीय गणना करण्याची गरज नाही असं संघाला वाटतंय. काही राजकीय पक्ष जातीय जनगणनेची मागणी करत असले तरी जातीगणना व्हायला नको असं संघाला वाटतंय. संघाच्या या भूमिकेची भाजपला अडचण नाही, असं श्रीधर घाडगे यांनी स्पष्ट केलं.

आपल्या देशाचे पंतप्रधान इथेच घडले. कारण तृतीय संघशिक्षावर्ग इथेच होते. आणि पंतप्रधानांनी तृतीय संघशिक्षावर्ग केलंय. कठीण परिस्थितीत देशाचं काम करायला तयार करणे हे या भूमीनं साधलंय. संघ काही करणार नाही, पण स्वयंसेवक काही सोडणार नाही. आपले स्वयंसेवक सर्व क्षेत्रात गेले आणि चांगलं काम केलंय. मग ते राजकीय क्षेत्र असो की कोणतंही स्वयंसेवकांनी चांगलं काम केलंय, असं श्रीधर घाडगे म्हणाले.

विचार टिकून राहणं इतकं…

राजकीय आयुष्यात आपण अनेक चढउतार पाहिले. आपण दोम वरून 183 वर गेलाय. विचार घेऊन टिकून राहणं सोप्पं नसतं. शताब्दीचा वर्षाचा विचार होतो, तेव्हा स्वयंसेवकांचा विचार होतो. समन्वयाच्या बैठकीत पुढील दोन वर्षांचं नियोजन करण्यात आलंय. देशात कशा प्रकारचं परिवर्तन पाहिजे हे पाच कामं सरसंघचालक सांगत असते, असं घाडगे यांनी सांगितलं.

संघाचा आमदारांसाठीचा पंचसूत्री कार्यक्रम

1) एकीकडे जातीभेद मानायचा नाही. दुसरीकडे जातीय जणगणनेची मागणी करायची. समरस भाजप उभा रहावा अशी आमची भावना

2) भारताची कुटुंब व्यवस्था आणखी मजबूत करणे

3) पर्यावरणाचं संतुलन साधणे

4) आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आपली भूमिका. स्वाधीनतेपासून स्वातंत्र्याकडे… स्वदेशी, स्वावलंबन

5) संविधानाचं पालन करताना अधिकार असताना कर्तव्य बजावने गरजेचं. नागरी कर्तव्य

Protected Content