घरात घुसून महिलेला शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील भिलवाडी येथे राहत असलेल्या ४१ वर्षीय महिलेचे चार मुले हिसकावून घेत शिवीगाळ करत घरात घुसून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून विनयभंग केला आणि त्यांना घरातून हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी २३ जून रोजी दुपारी २ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील भिलवाडी परिसरातील एका भागात ४१ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १ ऑगस्ट २०२४ ते १ मे २०२५ या कालावधीत पिडीत महिला ही आपल्या चार मुलांसह राहत असतांना तिचे ननंद, नंदोई भाऊ आणि ननंदचा मुलगा या तीन जणांनी तिचे चारही मुले हिसकावून घेतले, तसेच तिच्या घरात घुसून तिला गल्लीतील लोकांसमोर मारहाण करून तिला तिच्या घरातून काढून टाकले. तसेच तिचा विनयभंग देखील केला. तसेच तिला जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली आहे. दरम्यान त्यांनी याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार पिडीत महिलेचे ननंद, नंदोई भाऊ आणि ननंदचा मुलगा सर्व राहणार भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक पाटील हे करीत आहे.