जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलबाळ होत नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथील विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली होती, विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू-सासर्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ममता शंकर भील (वय-२३) रा. मन्यारखेडा ता.जि.जळगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे.
भुसावळ तालुक्यातील जुगलखोरी येथील माहेर असलेल्या ममता शंकर भील यांच्या विवाह जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथील शंकर सुरेश बागले यांच्याशी तीन वर्षांपुर्वी झालेला आहे. सासरी पती, सासरे, सासू आणि नणंद यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. गुरूवार ६ जुलै रोजी घरी कुणीही नसतांना राहत्या घरात विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार सायंकाळी ५ वाजता उघडकीला आला. दरम्यान, विवाहितेला मुलबाळ होत नाही म्हणून तिचा गेल्या तीन वर्षांपासून छळ सुरू होता. त्यांच्या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मयत विवाहितेची आई, देवकाबाई व वडील अर्जून एकनाथ भिल यांनी केली आहे त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती शंकर सुरेश बागले, सासरे सुरेश रामदास बागले, सासू रेखा सुरेश बागले आणि नणंद सुरेखा सर्व रा. मन्यारखेडा ता. जि. जळगाव यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे..