अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील खर्दे गावात आज (सोमवारी १२ मे) दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतात वीज पडल्याने एक बैल जागीच ठार झाला, तर तीन गुरे जखमी झाली आहेत. या दुर्घटनेत शेतात काम करत असलेला सालदार राहुल बारेला हा गंभीर भाजला असून, त्याला तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर लोंढवे गावात आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या लिंबू बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
अधिक माहिती अशी की, खर्दे गावातील शेतकरी आपल्या जनावरांना चरायला घेऊन गेले होते, त्याचवेळी अचानक आलेल्या वादळात वीज कोसळली. या दुर्घटनेत एका बैलाचा त्वरित मृत्यू झाला, तर इतर तीन गुरे जखमी झाली. तसेच, शेतात काम करणारे राहुल बारेला हे देखील वीजेच्या धक्क्याने गंभीर भाजले गेले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, लोंढवे गावात वादळाने अक्षरशः थैमान घातले. अनेक शेतकऱ्यांच्या लिंबू बागा उद्ध्वस्त झाल्या असून, उभ्या असलेल्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, या वादळामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आता शासनाने मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे.