पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ आढळली दागिन्यांनी भरलेली पिशवी (व्हिडीओ)

पाचोरा, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा रेल्वे स्थानकाजवळील पी.जे. रेल्वे स्थानकानजीक महिला सफाई कामगाराला ६ लाख ६ हजार ८०९ रुपये किंमतीचे बेवारस सोन्याचे दागिने सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेने प्रामाणिकता दाखवत सदरील सापडलेले सोन्याचे दागिने पाचोरा जीआरपीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर बोरुडे यांचेकडे सुपुर्द करुन मानुसकीचे दर्शन घडविले आहे.

 

याबाबत पाचोरा जीआरपी कडून प्राप्त माहितीनुसार गुरूवार १६ जुन रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास रेल्वे महिला सफाई कामगार उषाबाई गायकवाड ह्या ड्युटीवर असतांना रेल्वे स्टेशन परिसर साफ सफाई करण्यात व्यस्त होत्या. दरम्यान दुपारी २:३० वाजेच्या सुमारास जमा केलेला कचरा फेकण्यासाठी त्या पीजे रेल्वे स्थानकानजीक गेल्या असता त्यांना कचरा फेकण्याच्या ठिकाणी एक निळ्या रंगाची कॅरी बॅग आढळुन आली.

 

सदरची कॅरी बॅग उषाबाई गायकवाड यांनी रेल्वे सफाई विभागाचे सुपरवायझर शरद पाटील यांच्याकडे दिल्यानंतर शरद पाटील व त्यांचे सहकारी कॅरी बॅग घेऊन जीआरपी कार्यालयात जावुन तेथे सेवेवर असलेल्या एएसआय ईश्वर बोरुडे यांनी दाखवली असता ईश्वर बोरुडे यांनी सर्वां समोर कॅरी बॅग उघडली असता त्यांना सोन्याचे १ हार, ४ बांगड्या, १ पेंडल, १ जोड कानातील रिंग, १ जोड साखळी टाप्स व १ गळ्यातील चैन आढळून आले. दरम्यान ईश्वर बोरुडे यांनी दोन सरकारी पंचासह पंचनामा करुन सदरील मुद्देमाल पाचोरा येथील सराफ असोसिएशनकडे नेवुन सदरच्या ऐवजाची तपासणी केली असता आढळुन आलेला ऐवज हा सोन्याचा असल्याचे निष्पन्न झाले. ऐवजाचे वजन केले असता १२९. ६६० इतके वजनाचे ६ लाख ६ हजार ८०९ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे असल्याची खात्री झाल्यानंतर एएसआय ईश्वर बोरुडे यांनी सदरचा प्रकार त्यांचे वरिष्ठ एपीआय किसन राख यांना कळविल्यानंतर ते देखील पाचोरा येथील जीआरपी कार्यालयात दाखल झाले. तद्नंतर सविस्तर पंचनामा करत सापडलेले बेवारस सोन्याचे दागिने एएसआय ईश्वर बोरुडे यांनी एपीआय किसन राख यांचे स्वाधीन केले आहे. या घटनेचा पुढील तपास किसन राख हे करीत आहेत.

 

Protected Content