खेळता-खेळता इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईच्या कांदिवली परिसरात धक्कादायक घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने ९ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मृत मुलगी आपल्या भावंडांसह बाल्कनीत खेळत होती. मात्र, अचानक तिचा तोल गेला आणि ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. मुलीच्या वडिलांनी तिला त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिया विश्वकर्मा असे बाल्कनीतून पडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. आशिया ही इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी असून आपल्या कुटुंबासोबत कांदिवली येथे भाड्याने राहत होती. मंगळवारी आशियाचे वडील मानसिंह विश्वकर्मा यांची तब्येत ठिक नसल्याने ते आराम करत होते. मात्र, अचानक त्यांना पुतण्यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी बाल्कनीत जाऊन पाहिले तर त्यांचे दोन्ही पुतणे तुटलेल्या ग्रीलला लटकले होते आणि आशिया गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेली दिसली. त्यांनी पटकन दोन्ही मुलांना वर काढले आणि तळमजल्यावर धाव घेतली. मानसिंहने तिला तातडीने बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास आशियाचा मृत्यू झाला. या घटनेत आशियाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आशियाचा मृतदेह तिच्या कुटुंबांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मात्र, या घटनेने परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले.

Protected Content