सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया मे २०२४ मध्ये घेतलेल्या सीए इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. फायनलच्या परीक्षेत दिल्लीच्या शिवम मिश्रानं ५०० गुण मिळवून संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्लीच्या वर्षा अरोरा हिनं ४८० गुणांसह दुसरा तर, मुंबईच्या किरण राजेंद्र सिंग आणि नवी मुंबईच्या घिलमान सलीम अन्सारी या दोघांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.

भिवंडी येथील कुशाग्र रॉय याने सीए इंटरमिजिएट परीक्षेत ५३८ गुण मिळवून अव्वल स्थान पटकावलं आहे. युग सचिन कारिया आणि यज्ञ ललित चांडक दुसरे आले. त्या दोघांनाही ५२६ गुण मिळाले. तिसरा क्रमांक दिल्लीचा मनितसिंग भाटिया आणि मुंबईचा हिरेश काशीरामका यांनी पटकावला आहे. त्यांना ५१९ गुण मिळाले आहेत.

मे महिन्यात झालेल्या सीए फायनलच्या परीक्षेत ७४,८८७ उमेदवारांनी गट १ ची परीक्षा दिली होती, त्यापैकी फक्त २०,४७९ उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. गट २ ची परीक्षा ५८,८९१ उमेदवारांनी दिली होती, त्यापैकी केवळ २१,४०८ उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. दोन्ही गटातील ३५,८१९ उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी केवळ ७१२२ उमेदवार उत्तीर्ण झाले. दोन्ही गटांचे उत्तीर्णतेचे प्रमाण १९.८८ टक्के आहे.

आयसीएआय दिलेल्या माहितीनुसार, सीए इंटरमीडिएट परीक्षेत गट १ साठी १,१७,७६४ उमेदवार बसले होते, त्यापैकी केवळ ३१,९७८ उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण झाले. तर ७१,१४५ उमेदवारांनी गट २ ची परीक्षा दिली होती, त्यापैकी केवळ १३००८ उमेदवार उत्तीर्ण झाले. दोन्ही गटातील ५९,९५६ उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी केवळ ११०४१ उमेदवार उत्तीर्ण झाले.

Protected Content