मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई पोलिसांनी बनावट नोटासंदर्भात मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारुन बनावट नोटा छापणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तो तरूण युट्युबवर पाहून घरातच नोटा छापत होता. त्याच्या घरातून दोन लाख तीन हजार किंमतीच्या 50, 100 आणि 200 रुपयांच्या छापलेल्या बनावट आणि बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणार साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रफुल्ल गोंविद पाटील असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील प्रफुल्ल हा नववी शिकलेला असून घरच्यांपासून एकटाच वेगळा राहतो. आर्थिक चणचण भागवण्यासाठी त्याने बनावट नोटा कशा तयार करायच्या याची माहिती यूट्यूबवर मिळवली होती. याद्वारे त्याने 10, 20, 50, 100 व 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली होती. मागील दीड महिन्यात त्याने एक लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरात आणल्याची प्राथमिक माहिती आहे. मागील तीन चार महिन्यापासून प्रफुल्ल पाटील याने अशा पद्धतीने बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत किती बनावट नोटा बाजारात आणल्या याबाबत पोलिस तपास करत आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचून तळोजा एमआयडीसी परिसरातून प्रफुल्ल पाटील यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडे छापलेल्या 2 लाख रुपये किंमतीच्या 1,443 बनावट नोटादेखील सापडल्या. त्यामध्ये पन्नासच्या 574, शंभरच्या 33 आणि दोनशेच्या 856 बनावट नोटांचा समावेश आहे. घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.