पुण्यातील बीव्हीजीच्या मुख्य कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

income tax department

 

पुणे प्रतिनिधी । भारतातील सेवा क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या मुख्य कार्यालयावर आज (दि.6) आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. कोणत्या कारणासाठी ही कारवाई करण्यात आलीय, हे अद्याप समजू शकलेले नाही.

सुत्रांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील बीव्हीजीच्या मुख्य कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी अचानक धाड टाकली. त्याचबरोबर कंपनीच्या दिल्ली, मुंबई, पुणे येथील कार्यालयावरही छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान, कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध प्रकारच्या सेवा पुरवण्याचे काम बीव्हीजी कंपनी करते. राष्ट्रपती भवन, संसद भवन या ठिकाणच्या अनेक कामांची कंत्राटे या कंपनीकडे आहेत. त्याचबरोबर आशियातील सर्वांत श्रीमंत महानगर पालिका म्हणून उल्लेखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कंत्राटही याच कंपनीकडे आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राष्ट्रपती भवन अशा विविध ठिकाणी अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने स्वच्छतेचे काम या कंपनीद्वारे केले जाते. त्याचबरोबर, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा आणि कृषी क्षेत्रात बियाणं, खतं आणि किटकनाशके निर्मितीतही बीव्हीजी काम करते.

Protected Content