महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपात विलीनीकरण

कणकवली, वृत्तसेवा | माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज अखेर भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे हा विलिनीकरण सोहळा पार पडला. राणे कुटुंबीयांसह स्वाभिमान पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला.

शिवसेना आणि राणे कुटुंबीयांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसवर नाराज होऊन पक्ष सोडल्यापासून राणे यांचा राजकीय आलेख घसरत चालला होता. कुडाळ विधानसभा मतदारसंघात खुद्द राणे यांचा पराभव झाला. थोरले चिरंजीव नीलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव झाला. त्यामुळं राणे राजकीयदृष्ट्या संपल्याचं बोललं जात होतं. यातून बाहेर पडण्यासाठी अखेर राणे यांनी स्वत:चा पक्ष स्थापून भाजपशी जवळीक साधली. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेची खासदारकीही मिळाली. मात्र, युतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या विरोधामुळं त्यांचा भाजपमधील प्रवेश रखडला होता. शिवसेनेला विश्वासात घेऊनच राणे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं होतं. अखेर हा प्रवेश आज झाला.

Protected Content