पुणे : वृत्तसंस्था । वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ‘एमबीबीएस’साठी राज्यातील सरकारी आणि खासगी महाविद्यालयात एकूण ६,६००, तर बीडीएससाठी २,६७६ जागा उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) वेबसाइटवर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘नीट’चा निकाल वाढल्याने; तसेच ७०:३० कोटा रद्द झाल्याने, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी झगडावे लागणार आहे.
‘सीईटी सेल’ने एमबीबीएस, बीडीएस अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेस सुरुवात केली आहे. त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे. या वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांत मोठी चुरस असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या प्रवेशक्षमतेचा अंदाज येण्यासाठी ‘सीईटी सेल’कडून प्रवेशक्षमता जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील एकूण २५ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत ४,३३० जागा आहेत, तर १८ खासगी महाविद्यालयांत २,२७० जागा उपलब्ध आहेत. चार सरकारी दंतवैद्यकीय महाविद्यालयांत ३२६ जागा, २५ खासगी दंतवैद्यकीय महाविद्यालयांत २,३५० जागा उपलब्ध असल्याचे ‘सीईटी सेल’कडून सांगण्यात आले आहे.
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत उपलब्ध जागांपैकी १५ टक्के जागा ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. यंदा ‘नीट’चा निकाल चांगला लागल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी मोठी चुरस असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या प्रवेशक्षमतेत राज्यातील खासगी विद्यापीठांतील जागांची माहिती वगळण्यात आली आहे.
राज्य सरकारने वैद्यकीय प्रवेशांसाठी प्रादेशिक विभागानुसार असणारा ७०:३० चा कोटा रद्द केल्यामुळे, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी चांगलीच स्पर्धा करावी लागणार आहे,
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी प्रवेशासाठी कोटा राखीव असल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची हमी मिळत होती. यंदा मात्र यांच्यासोबत सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी झगडावे लागणार आहे.