राज्य सरकार धनगरांच्या विरोधात : गोपीचंद पडळकरांचा आरोप

 

मुंबई प्रतिनिधी । हिवाळी अधिवेशानाच्या पहिल्या दिवशी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पारंपरीक वेशभूषेत आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर राज्य सरकार हे धनगरांच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

धनगर समाजाच्या प्रश्‍नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर खास धनगरी वेष परिधान करुन आणि ढोल वाजवत आंदोलन केलं. यानंतर त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून धनगर आरक्षणाच्या प्रश्‍नावर एकही बैठक घेतली गेली नाही. महाविकास आघाडी सरकारमधीलच काही नेते पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्‍न विचारत होते. मग आता तेच नेते गप्प का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केलाय.

पडळकर पुढे म्हणाले की, झोपेचं सोंग घेणार्‍या सरकारला जागं करण्यासाठी धनगरी पेहराव परिधान करुन, ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपण करत आहे. हा पेहराव आणि ढोल म्हणजे आमचा स्वाभिमान, अभिमान आणि अस्तित्व आहे. पण या अस्तिस्वाशी खेळ करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असल्याची टीका पडळकरांनी केलीय.

राज्यातील शेतकर्‍यांच्या मुंड्या पिरगाळण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. शेतकर्‍यांचे हाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दलाल मालामाल अशी स्थिती राज्यात झाली आहे. त्यांच्या प्रत्येक सरदाराला कारखाना, सूत गिरणी, शिक्षण संस्था, दूध संघ आणि ज्याला काही देता आलं नाही त्याला मार्केट कमिटी, हे राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसचं धोरण असल्याची टीका यावेळी पडळकरांनी केली आहे.

Protected Content