मुक्ताईनगर तालुक्यात दिव्यांग सल्ला कक्ष स्थापन करण्यास टाळाटाळ

 

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । जिल्ह्यात शासन निर्णयानुसार तालुकास्तरावर दिव्यांग सल्ला कक्ष स्थापन करण्यात येत आहे. मात्र, मुक्ताईनगर तालुक्यात कक्ष स्थापन करण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असून तालुक्यात लवकरात लवकर दिव्यांग कक्ष स्थापन करण्यात यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉ. विवेक सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, प्रत्येक तालुका पातळीवर पंचायत समितीमध्ये दिव्यांग सल्ला कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांनी दिले आहे. जेणेकरून प्रत्येक दिव्यांग बांधवांना त्याच्या लाभाच्या योजनांची माहिती मिळावी व त्यांच्या तक्रारीचे निवारण लवकरात लवकर करण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये दिव्यांग सल्ला कक्ष सुरू झाले आहे. परंतु, मुक्ताईनगर पंचायत समितीमध्ये हे कक्ष अजून सुरू करण्यात आलेले नाही. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देतात. गट विकास अधिकारी हे बोदवड पंचायत समितीमधील प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून काम पाहत असून तेथे दिव्यांग सल्ला कक्ष स्थापन करण्यात आले आहे. मुक्ताईनगरला दिव्यांग कक्ष का स्थापन झाला नाही ? असा प्रश्न डॉ. सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर शासनमान्य निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा डॉ. सोनवणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यासंदर्भात, डॉ. विवेक सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , मंत्री बच्चू कडू , मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव , दंडाधिकारी तहसीलदार मुक्ताईनगर यांच्याकडेही यासंदर्भात तक्रार केलेली आहे. तरी प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा अशी डॉ.सोनवणे यांनी मागणी केली आहे.

Protected Content