नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना संकटात आयात कमी करून जास्तीत जास्त स्थानिक उत्पादनाला चालना देण्याचा सरकारला उद्देश आहे. आत्मनिर्भर भारतसाठी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र या संकल्पनेवर माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रश्न उपस्थित केले व भविष्यातील धोक्यांची सूचना सरकारला केली आहे.
आयात शुल्कात वाढ करून आपण आत्मनिर्भर होणार असू तर हे फारकाळ चालणार नाही. यापूर्वीही असा प्रयत्न झाला होता. मात्र त्याला यश मिळाले नाही, असे राजन यांनी सांगितले. त्यांनी आत्मनिर्भर भारत उपक्रमातील संभाव्य अडचणींचा आढावा घेतला.
निर्यातदारांना स्वस्त निर्यात करण्यासाठी त्यांना परवडणारा कच्चा माल बाजारात उपलब्ध होणे आवश्यक आहे. हा स्वस्त कच्चा माल त्यांना आयात करून मिळतो, असे राजन यांनी सांगितले. निर्यातीच्या जोरावरच चीनने जागतिक बाजारात आपले स्थान बळकट केले आहे, असे राजन यांनी सांगितले. बाहेरील देशांतील स्वस्त दरात वस्तू आयात करणे आणि त्याची जोडणी करून त्या पुन्हा निर्यात करणे हे तंत्र चीनने विकसित केले असून ते यशस्वी केलं आहे.
राजन पुढे म्हणाले की जर निर्यात करायची असेल तर आयात करावी लागेल. त्यामुळे आयातीवर भरमसाठ शुल्क वाढ नको, त्याऐवजी भारतात उत्पादनासाठी पर्याय तयार करा, आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या तरतुदींवर देखील राजन यांनी बोट ठेवले आहे. खर्चावर नियंत्रण आणि देखरेख आवश्यक आहे. रिकामी चेकबुक दाखवण्याची ही वेळ नाही, असा सावधानतेचा इशारा राजन यांनी सरकारला दिला आहे.
राजन यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारमधील एकाधीकारशाहीला लक्ष्य केलं आहे. विकासाला चालना देण्यासाठी सुधारणांचा कार्यक्रम सुरूच ठेवावा लागेल. मात्र त्यासाठी सर्वांची सहमती आवश्यक आहे. सरकराने विरोधक, टीकाकार यांच्याशी संवाद साधला पाहिजे. यातून काही वेगळं निष्पन्न होईल. लोकशाहीमध्ये सर्वांना सोबत घेणं गरजेचे आहे, असे राजन यांनी सांगितले.