नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ‘मोदी सरकार देशाच्या एक-एक इंच जमिनीला वाचवण्यासाठी संपूर्णत: सजग आहे. कुणीही या जमिनीवर बळजबरीनं ताबा मिळवू शकणार नाही’ असं अमित शहा यांनी म्हटलंय.
चीनसोबतचा लडाखचा वाद सोडवण्यासाठी भारत सरकारकडून सैन्य आणि राजनैतिक स्तरावर हरएक प्रयत्न केले जात आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.
चीननं भारतीय क्षेत्रात प्रवेश केला आहे का? या प्रश्नावर त्यांनी म्हटलं आपलं सुरक्षा दल आणि नेतृत्व देशाचं सार्वभौमत्व आणि सीमेच्या रक्षणासाठी समर्थ आहेत, प्रतिबद्ध आहेत’. ते एका मुलाखतीत बोलत होते.
आगामी बिहार निवडणुकीत एनडीएला दोन-तृतीयांश बहुमत मिळेल, असं त्यांनी ठामपणे सांगितलंय. नीतीश कुमार हेच निवडणुकीनंतर राज्यातील पुढचे मुख्यमंत्री असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. ‘बिहारमध्ये जदयूनं भाजपपेक्षा जास्त जागा मिळवल्या तर भाजपकडून मुख्यमंत्रीपदावर दावा केला जाणार का?’ असा प्रश्न अमित शहा यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ‘यात कोणताही प्रश्न नाही. नीतीश कुमार हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. आम्ही ही सार्वजनिक घोषणा केलीय आणि आम्ही याबद्दल प्रतिबद्ध आहोत’ असं अमित शहा यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, बिहारमध्ये निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाताळत आहेत.
पश्चिम बंगालबाबत बोलताना, पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीनंतर राज्यात परिस्थिती बदललेली दिसेल आणि इथंही भाजप सत्तेत येईल, असंही अमित शहा यांना वाटतंय.