फेब्रुवारी २०२१ नंतर भारत कोरोनामुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतात कोरोना संक्रमणानं सर्वोच्च टप्पा पार केल्याचा दावा केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एका सरकारी समितीनं केलाय. समितीनं केलेल्या दाव्यानुसार, फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोना संक्रमण संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

भारतात रुग्णांची संख्या एक कोटी सहा लाखांहून पुढे जाणार नाही, असा कयासही या समितीनं बांधलाय. भारतात सध्या एकूण संक्रमितांची संख्या ७५ लाखांच्या जवळपास पोहचलीय. व्हायरसपाचून बचावासाठी करण्यात येणारे उपाय यापुढे सुरूच ठेवायला हवेत, असा सल्लाही समितीनं दिलाय.

स्थितीचं आकलन करण्यासाठी केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजयराघवन यांच्याकडून या समितीचं गठण करण्यात आलं होतं. आयआयटी हैदराबादचे प्रोफेसर एम विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. समितीच्या म्हणण्यानुसार, भारतानं मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केला नसता तर देशभरात २५ लाखांहून अधिक मृत्यू झाले असते. भारतात एव्हाना १.१४ लाख करोनारुग्णांचा मृत्यू झालाय.

कोविड १९ प्रतिबंधात्मक लस सर्वांना वेगानं उपलब्ध होईल अशा व्यवस्थेवर काम करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या. लस वितरणाचं नियोजन करताना देशाची भौगोलिक रचना आणि विविधता लक्षात घेण्याचे आदेशही मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. पंतप्रधान मोदी यांनी कोविड-१९वरील प्रतिबंधात्मक लशीच्या उपलब्धतेचा आणि तिच्या वितरण व्यवस्थेच्या नियोजनाचा बैठकीत आढावा घेतला.

ही बैठक लशीच्या वितरणावरच केंद्रीत होती. बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर सरकारकडून एक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आलंय. लस उपलब्ध होताच प्रक्रियेच्या प्रत्येक पावलावर काटेकोरपणे चाचणी करण्याचे आदेश मोदी यांनी या बैठकीत दिले. लशीचे डोस थंड वातावरणात ठेवणे, लशीकरण केंद्रांमधील यंत्रणेवर लक्ष ठेवणे, सीरिंजसारख्या वस्तूंची तयारी आणि साठा करणे यासारख्या प्रक्रियेकडे काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.

Protected Content