भंगार बाजार ताब्यात घेण्याच्या ठरावाला महासभेत मंजुरी

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुली जवळील महापालिकेच्या जागेवरील भंगार बाजाराच्या प्रस्तावावरून आजची महासभा चांगलीच गाजली. यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडून शिवसेना आणि एमआयएम पक्षाने या प्रस्तावाला विरोध दर्शविला. सत्ताधाऱ्यांनी विरोधास न जुमानता बहुमताच्या बळावर प्रस्ताव मंजूर करून घेतला.

महापालिकेची ऑनलाईन महासभा महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. भंगार बाजार ९९ वर्षाकरीता भाडेतत्वाने देणे बाबत तत्कालीन नगरपालिकेचा ठराव रद्द करण्याचा प्रशासनाच्या प्रस्तावावर समितीने गठित करण्यात आली होती. त्याचा अहवाल मांडल्यानंतर या विषयाला एमआयएमचे गटनेते रियाज बागवान यांनी हरकत घेतली. दोनशे लोकांचा यावर उदरनिर्वाह चालतो, मात्र त्यांचा विचार करण्यात आला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवसेना सदस्य इब्राहिम पटेल यांनी देखील हरकत घेत ३० वर्षापूर्वीचा हा विषय असून तेथील विक्रेत्यांना अतिक्रमणधारक समजले जाते असे सभागृहास निदर्शनास आणून दिले. भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी या आहवालावर सखोल चर्चा झाली असून दोन वर्षापासून कोणी ही विरोध केला नाही आज का विरोध का करता असा प्रश्‍न उपस्थित केला. शिवसेना व एमआयएम यांनी विरोध कायम ठेवला तर भाजपाने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला.

शहरातील रस्त्याच्या दुरुस्तीच्या विविध कामांवर शिवसेना सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, नितीन बरडे, यांनी विविध रस्त्यांच्या कामाबाबत प्रश्‍न उपस्थितीत केलेत. त्यांनी ठरावीक नगरसेवकांच्या वॉर्डात निधी का दिला जातो ? असा आरोप केला. यावर भाजप शिवसेना सदस्यांमध्ये चांगलाच शाब्दीक चकमक झाली.

ऍड. शुचिता हाडा यांनी शहरातील व्यवसायीक व घरपट्टीचे दुकाने ज्या कालवधीत दुकाने बंद होते त्या काळातील कर माफीचा ठराव मांडला असता तो एक मताने मंजूर करण्यात आला. राज्य शासनाच्या कोरोना काळातील नियमानुसार दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांना मागील थकबाकी भरल्यानंतर कर माफी देण्याची अट टाकण्यात आली आहे. महासभेत २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षणाची माहिती देण्यात आली. यावेळी अहवाल सदस्यांना अवगत केला आहे का प्रश्‍न नितीन लढा यांनी उपस्थित केला. यावर उपायुक्त वाहुळे यांनी सर्वपक्षातील गटनेत्यांना अहवाल दिला असल्याची माहिती दिली. मात्र नगरसेवकांनी माहिती दिली नसल्याने लढ्ढा, रियाज बागवान यांनी नाराजी व्यक्त केली.

 

 

Protected Content