मुंबई- वृत्तसंस्था । सुशांतसिंग मृत्यूच्या गुन्ह्याचा वापर करुन महाराष्ट्राला बदनाम करत राष्ट्रीय महत्व कमी करण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. नंतर आता बॉलिवूडला टार्गेट करण्याचे षडयंत्र रचले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
अभिनेता सुशांतसिंग प्रकरणाचा वापर करुन महाराष्ट्राला बदनाम करत राष्ट्रीय महत्व कमी करण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. या कटाचा एक भाग असलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला असून तो तात्काळ मंजूरही करण्यात आला आहे. या पांडेंना लवकरच भाजपाकडून मोठे बक्षीस मिळू शकेल यात शंका नाही. सुशांतनंतर आता बॉलिवूडला टार्गेट करण्याचे षडयंत्र रचले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीवर शंका उपस्थित करत काँग्रेसने प्रश्नांची मालिका सुरु केली आहे. मोदी यांचे प्रिय राकेश अस्थाना महासंचालक असलेल्या एनसीबीला सांवत यांनी तीन प्रश्न विचारले आहेत. ‘मुंबईत एनसीबीचे अनेक वर्षांपासून कार्यालय आहे आणि बॉलिवूडही मुंबईतच आहे, असे असताना आतापर्यंत त्यांनी बॉलिवूड व ड्रग कनेक्शन संदर्भात चौकशी का केली नाही. त्यांनी अशी चौकशी करु नये असा आमचा आक्षेप नक्कीच नाही. दुसरे असे की, सुशांत प्रकरणातील ड्रग अँगलच्या तपासासाठी ईडीने एनसीबीला पाचारण केले होते. एनसीबीने १५/२०२० च्या पहिल्या एफआयआर नुसार आतापर्यंत एकही अटक केलेली नाही. ज्या अटक करण्यात आल्या आहेत त्या १६/२०२० च्या दुसऱ्या एफआयआरनुसार केलेल्या आहेत मग एनसीबीने सुशांतसिंग प्रकरणाचा तपास सोडून दिला आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे आणि तिसरे, बॉलिवूडला ड्रगशी जोडण्यासंदर्भात कोणतेही भक्कम पुरावे एनसीबीकडे नाहीत हे सरकारने संसदेत सांगितले आहे त्यावर एनसीबीचे मत काय ?
बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांतसिंग प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी केली. आता त्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला आणि तो तात्काळ मंजूरही करण्यात आला. वास्तविक पाहता यासाठी तीन महिन्यांची नोटीस द्यावी लागते परंतु पांडेंनी अर्ज दाखल करताच सरकारने मेहरबानी दाखवत तो मंजूर केला असून भाजपाकडून पांडेंना आणखी मोठे बक्षीस दिले जाण्याची शक्यता आहे.
भाजपाला सुशांतसिंगबदद्ल काही आत्मियता नाही मात्र त्याच्या मृत्यूचा वापर बिहार निवडणुकीसाठी आणि महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी करता येऊ शकतो हे पाहून त्यांनी या संधीचा वापर करुन घेतला. देश पातळीवर मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी व लोकांचे लक्ष मुख्य समस्यांपासून दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाने या मुद्द्यांचा वापर केला. आता बॉलिवूडला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसापूर्वीच उत्तर प्रदेशात चित्रपटसृष्टी उभी करण्याची घोषणा केली हा काही निव्वळ योगायोग नाही, असे सावंत म्हणाले.