नवी दिल्ली । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना यूपीए-२च्या काळात पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती. तथापि, त्यांनी याचा स्वीकार केला नसल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल यांनी आज केला आहे.
युपीए-२ सरकारमधील तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वतःच त्यांना पंतप्रधान होण्याचा प्रस्तान दिला होता, असा दावा काँग्रेस प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांनी केला आहे. ते ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते.
गोहिल म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रकृतीच्या समस्येमुळे राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावे, असा प्रस्तान ठेवला होता. मात्र, राहुल गांधी यांनी त्यांचा हा प्रस्ताव न स्वीकारता, आपण आपला कार्यकाळ पूर्ण करावा, अशी विनंती केली होती.
याप्रसंगी गोहिल म्हणाले की, गांधी कुटुंबाने कधी सत्तेची महत्त्वाकांक्षा ठेवली नाही आणि कधीही सत्तेची लालसा धरली नाही. देशभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि तरुणांची इच्छा आहे, की राहुल गांधी यांनी त्यांचे नेतृत्व करावे. मात्र, यासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच अंतिम निर्णय घेईल, असेही गोहिल म्हणाले. सध्या सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष आहेत. तसेच पक्षातील एक वर्ग सातत्याने राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा पुन्हा सांभाळावी यासाठी आग्रही आहे. या पार्श्वभूमिवर गोहिल यांच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.