जळगाव, प्रतिनिधी । राज्य शासनाने दिनांक १५ जुनच्या परिपत्रकाद्वारे पूर्व प्राथमिक तसेच पहिल्या व दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आँनलाईन पध्दतीने शिक्षण देण्यावर बंदी घातली आहे. परंतु शासनाच्या आदेशाला न जुमानता, जळगाव जिल्ह्यातील तसेच शहरातील बहुतांश खाजगी विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आँनलाईन शिक्षण नियमबाह्यरित्या सुरूच ठेवले आहे.
विद्यार्थ्यांना समजो अथवा ना समजो शाळा मात्र त्यांचे ऑनलाईन काम करून मोकळे होत आहेत. फक्त फी वसुलीसाठी ऑनलाईन माध्यमातून शाळा सुरू केल्या आहेत. शाळा सुरू होईपर्यंत फी न भरण्याचे आदेश असतांना ऑनलाईन शिक्षण सांगून शाळा व्यवस्थापनाने फी चार्टच पालकांपुढे ठेवला आहे. यात पालकांची कोंडी आणि विद्यार्थ्यांची गोची होत आहे. विद्यार्थ्यांची मानसिकताही बिघडत चालली आहे. केवळ फी वसुल करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा हा किळसवाणा प्रकार आहे. बोटावर मोजण्याइतकेच शाळा शासनाचे नियम पाळत असून बाकी शाळांनी सर्व नियम धाब्यावर बसवले आहे. शिक्षण अधिकारींना मात्र या सर्वच शाळा नियमात सुरू आहे असा गोडभ्रम आहे,कारण आतापर्यंत एकही शाळेवर कारवाई करण्याची त्यांनी तत्परता दाखवलेली नाही. त्यामुळे युवासेनाकडून काही शाळेंना आम्ही भेट दिल्या आहे. लाॅकडाऊन नंतर तक्रारी आलेल्या शाळांना युवासेना भेट देणार आहे, अशा नियम मोडणाऱ्या जिल्ह्यातील शाळांच्या व्यवस्थापनाविरुध्द आम्ही स्वतः गुन्हे दाखल करणार आहोत असे विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या युवासेनेचे सरचिटणीस राहुल पोतदार आणि पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.