वरणगावलाच होणार राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र ! : ना. गुलाबराव पाटील यांचे यशस्वी प्रयत्न

उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मान्यता

जळगाव प्रतिनिधी– भुसावळ तालुक्यातील हतनूर-वरणगाव येथील राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र जामखेड तालुक्यात स्थलांतरीत करण्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी याबाबत चर्चा करून लागलीच आज उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यास भाग पाडले. यात एसआरपीएफ १३०३ हे प्रशिक्षण केंद्र हतनूर-वरणगाव येथेच होणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. तर आमच्यात कामाचा ‘दम’ ,पत व ‘धमक’ सुध्दा असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील हतनूर-वरणगाव येथे मंजुरी मिळालेले राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र २६ जून २०२०च्या निर्णयाने कुडसगाव (ता. जामखेड, जिल्हा नगर) येथे स्थलांतरीत करण्यात आले होते. यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. दरम्यान, हे प्रकरण घडल्यापासून यावर एक शब्द देखील न काढता राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी ‘मास्टरस्ट्रोक’ लगावत हे केंद्र पुन्हा आहे त्याच ठिकाणी म्हणजे वरणगाव खेचून आणले आहे. त्यांनी प्रारंभी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यांनी हे केंद्र वरणगाव येथेच असावे अशी मागणी करणारे निवेदन पत्र दिले. या अनुषंगाने काल राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकी नंतर ना.गुलाबराव पाटील यांनी या केंद्राबाबतचा मुद्दा आज गुरुवारी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे उपस्थित करून याबाबत चर्चा केली. या बैठकीत राज्य राखीव दलाच्या १३०३ बटालियनचे प्रशिक्षण केंद्र हे हतनूर-वरणगाव येथेच होणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, या संदर्भात गेल्या २५ वर्षात नेमके काय घडले याची माहिती सुध्दा त्यांनी कालानुक्रमे दिली आहे. ती खालीलप्रमाणे-

1. शासन निर्णय दिनांक 26/10/1994 नुसार वरणगाव येथे नवप्रविष्ठ पोलीस शिपाई यांना मुलगामी प्रशिक्षण देण्यासाठी नविन पोलीस प्रशिक्षण शाळा ( केंद्र ) सुरू करण्यास तत्वत: मान्यता ,
2. त्यानुसार सदर केंद्रासाठी हातनुर-वरणगाव परिसरातील 22 हेक्टर 94 आर जमिन पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आली.
3. दि. 23/3/1999 रोजी निधी मागणीचा सुधारीत प्रस्ताव शासनास सादर केला होता. मात्र या प्रस्तावाला प्रशासकिय मान्यताच नसल्याने 10 कोटी निधी मागणीचा प्रस्ताव पोलीस महामंडळाच्या संचालकांच्या बैठकीत रद्द,
4.दरम्यान 17/02/2010 रोजी मंत्री मंडळाच्या बैठकीत वरणगाव येथे नविन पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास तत्वत: मान्यत,
5.दि.06/04/2010 रोजी प्रधान सचिव मेधा गाडगीळ यांचे अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांना नविन पोलीस प्रशीक्षण विद्यालयाच्या बांधकाम, साहित्य व साधन सामुग्री प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश,
6.दि. 14/02/2011 रोजी अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालयाकडून 62.67 कोटी रूपये खर्चाचा सविस्तर प्रस्ताव शासनास सादर.,
7. मा. पोलीस महासंचालक,दि. 26/10/2016 अन्वये व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळ मर्या. वरळी -मुंबई यांना विद्यमान पोलीस प्रशिक्षण ‍विद्यालय ही नविन पोलीस शिपाईयांना प्रशिक्षण देण्यास सक्षम असून वरणगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र तयार करण्याची आवश्यकता नाही असा प्रस्ताव सादर.,
8. दरम्यान याबाबत विधानसभा अतारांकित प्रश्न क्रमांक 67621 अन्वये वरणगाव येथील नियोजित पोलीस प्रशिक्षण केंद्रबाबत प्रश्न,
9. जळगाव जिल्हा हा अतिसंवेदनशिल असून येथे नेहमी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरणगाव येथे पोलीस प्रशि क्षण केंद्राएवजी SRPF गृप उभारल्यास कायदा व सुव्यवस्थेच्या वेळी तात्काळ उपलब्ध होऊ शकतो असे लेखी निवेदन सादर,
10. दि. 13/09/2019 च्या शासन ‍ निर्णयानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्राऐवजी SRPF गृप (राज्य राखीव पोलीस बल गट क्र.19) स्थापन करण्यास तत्वत: मान्यता,
11. दि.26/06/2020 शासन निर्णयानुसार राज्य राखीव पोलीस बल गट क्र.19 हातनुर – वरणगाव येथे स्थापन करण्याऐवजी मंजूर पदांसह व मंजूर आवर्ती/अनावर्ती खर्चासह कुसडगाव ता. जामखेड जि.अहमदनगर येथे स्थापन करण्यास मान्यता.

पालकत्वाच्या कर्तव्याचे पालन केले- ना. गुलाबराव पाटील

दरम्यान, राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र हे हतनूर-वरणगाव येथेच होणार असल्यामुळे विरोधकांना मोठी चपराक बसली असून आमच्यात काम करण्याचा दम आणि धमक सुध्दा असल्याची प्रतिक्रिया ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले की, ज्यांना गेल्या २५ वर्षात या केंद्राची एक वीट सुध्दा उभारता आली नाही ते आमच्यावर टीका करत होते. मात्र आम्ही शाब्दीक वादात न पडता थेट करून दाखविले. आगामी अधिवेशनात या केंद्राला प्रशासकीय मान्यता मिळणार असून दोन वर्षात हे केंद्र पूर्णत्वाकडे येणार असल्याचे आमचे वचन आहे. जिल्ह्याचा पालक म्हणून आम्ही आमच्या कर्तव्याचे पालन करत आहोत. विरोधकांकडे बोंब ठोकण्याशिवाय काहीही उरले नसल्याचा टोला देखील ना. पाटील यांनी मारला आहे.

दरम्यान, वरणगावच्या केंद्रावरून प्रचंड आरोप-प्रत्यारोप होत असतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणावर भाष्य करण्याऐवजी थेट हे केंद्रच पुन्हा वरणगाव येथे खेचून आणल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रकल्प इतर ठिकाणी नेण्याचा प्रयत्न त्यांनी चांगल्या पध्दतीत हाणून पाडल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content