धरणगाव ग्रामीण रूग्णालयात लोकवर्गणीतून उभारणार ऑक्सीजन बेडची सुविधा

धरणगाव प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयात लोकवर्गणीतून ऑक्सीजन बेडची सुविधा उभारण्यात येणार असून आज लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून याला प्रारंभ करण्यात आला.

सध्या कोरोनाच्या आपत्तीमुळे सर्व जण हैराण झाले आहेत. केन्द्र व राज्य सरकार त्यांच्या त्यांच्या परीने कसोशीने प्रयत्न करीत आहेत. यासोबत आपण सुद्धा समाजाचे व गावाचे काही तरी देणं लागतो, याच उद्देशाने कोणताही साथीच्या आजार, अपघात केस बरे होण्यासाठी येथील ग्रामीण रूग्णालयात अकरा बेड, ऑक्सिजन पाईप लाईन, मोठे जनरेटर, तसेच मल्टीपॅरामिटर, मॉनिटर, इसीजी उपकरण, आरओ मशीन, पोर्टेबल एक्सरे मशिन अशा सुविधा आवश्यक आहेत. या अनुषंगाने एरंडोल विभागाचे, विभागीय अधिकारी तथा कोविड १९ चे नोडल अधिकारी विनय गोसावी यांनी लोक वर्गणीतून याला उभारण्याचे आवाहन केले आहे. गावातील राजकिय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, वकिल संघ, दुकानदार, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक अशा विविध संघटनां तसेच दानशूर व्यक्ती यांनी मदतीसाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले आहे. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात ही सुविधा कोविड संपल्यानंतर सुद्धा कायमस्वरूपी होणार आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत आज धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरील कामाचे अंदाज पत्रक घेवुन कामाचा शुभारंभ आज सकाळी करण्यात आला. प्रांताधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रु २५०००, गुलाबराव वाघ व शिवसेना धरणगाव २५००० रुपये, नगराध्यक्ष निलेश चौधरी व शिवसेना नगरसेवक २५००० रुपये अशी देणगी देण्यात आली. यासोबत प्रांताधिकारी विनय गोसावी १५००० रु, तहसिलदार ११०००, मुख्याधिकारी जनार्दन पवार ११००० अशी देणगी जमा करण्यात आली आहे. अजून बाकीचे राजकीय पदाधिकारी सुद्धा या कामी मदत करणार आहे असे तहसिलदार धरणगांव यांनी म्हटले आहे, या कामाच्या अंदाज पत्रकाच्या शुभारंभा प्रसंगी विभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीन कुमार देवरे, समन्वय समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, वैद्यकीय अधिक्षक डॉ गिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष पी. एम पाटील, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, विनय भावे, विलास महाजन विजय महाजन, राजेंद्र महाजन, संजय चौधरी, बाळासाहेब जाधव, राहुल रोकडे,वाल्मिक पाटील, अरविंद चौधरी, गोपाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content