यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील म्हैसवाडी येथील पोलीस पाटील यांनी गावात झालेल्या लग्नातील गर्दीची माहिती न दिल्याने त्यांना उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी निलंबित केले आहे.
म्हैसवड येथे मछिंद्र जयसिंग चौधरी यांचा मुलगा विक्की व त्यांचा भाऊ गोरख जयसिंग चौधरी यांचा मुलगा जितेंद्र यांच्या विवाहास ७० ते ८० लोकांचा समुदाय जमला होता. यातून म्हैसवाडी गावात कोरोना संसर्ग आजाराची १६ ते १७ जणांना लागण झाली. लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्यास पोलीस पाटील यांनी पोलिसांना माहिती देणे आवश्यक होते. मात्र, पोलीस पाटील सौ. प्रफुल्ला गोटूलाल चौधरी यांनी या लग्नाबाबत कोणतीच माहिती पोलिसांना किंवा महसूल यंत्रणेला दिली नाही. या लग्नाची खबर पोलिसांना गावातून मिळाल्यावर पोलीस पाटील सौ. चौधरी यांनी पोलीसात उशिराने २ जुलै रोजी गुन्हा दाखल केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभास ५० पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहू नये असे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केलेले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करणे, पोलीस पाटील या पदावर कार्यरत असतांना गावांतील माहिती वेळेवर न देणे व कर्तव्यात कसूर केल्याने उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी पोलीस पाटील सौ. प्रफुल्ला गोटूलाल चौधरी आज निलंबित केले आहे.