जळगाव प्रतिनिधी । कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉक डाऊनच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश जारी करून मद्यविक्रीला बंदी केली होती. या आदेशाचे उल्लंघन करून मद्य विक्री केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात नशिराबाद येथील क्रिश ट्रेडसचे राजकुमार शितलदास नोतवाणी रा. आदर्शनगर तसेच अनिता शिरीष चौधरी यांनी दाखल केलेले अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेत.
काय आहे प्रकरण
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये या अनुषंगाने देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. तर जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी जमावबंदीचे आदेश काढून जिल्ह्यात मद्यविक्रीला बंदी घातली आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात मद्यविक्री होत असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क पथकाने छापा टाकून तपासणी केली होती. 21 मार्च व 13 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग करून देशी विदेशी मद्याची विना पास परवाना अवैध विक्री केल्याचे या तपासणीतून स्पष्ट झाले. अनुज्ञाप्तीमधून लॉक डाऊनच्या काळात विदेशी मद्य, बियर,वाईनचा साठा अवैधरित्या विक्री करून त्याचे पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने फुटेज काढून टाकले म्हणून राज्य उत्पादन शुल्क चे नरेंद्र दहिवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी राजकुमार नोतवाणी तसेच अनिता शिरिष चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी दोघे संशयितांनी अटकपूर्व जामीन अर्ज न्या.एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात दाखल केले होते. तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सदर गुन्हा घडल्यापासून लॉक डाऊन चालू असल्याने चौकशी बाकी आहे. दुकानांमध्ये जास्त प्रमाणात रेकार्डवर नसलेला मद्य साठा मिळून आलेला असून तो कोठून आणला, रेकॉर्ड प्रमाणे माल मिळून न आल्याने तपास करणे आवश्यक आहे, म्हणून अर्ज नामंजूर करावेत, अशी विनंती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी युक्तिवादातून केली.