सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांमध्ये तीन फुटांच्या अंतर ; ट्रिपल लेअर मास्कही अनिवार्य

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ) कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी कार्यालयांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची दररोज थर्मल स्क्रिनिंग करणे, हवा खेळती राहण्यासाठी सरकारी कार्यालयातील सर्व खिडक्या उघड्या ठेवणे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी तीन पदरी मास्क संपूर्ण कार्यालयीन वेळेत वापरावा, अशा काही मार्गदर्शक सूचना केंद्राने दिल्या आहेत. तसेच सर्व राज्यांना त्याचे पालन करण्यास सांगितले आहे.

 

कर्मचाऱ्यांनी जंतुसंसर्ग टाळण्यासाठी नाकाला, डोळ्यांना आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे. सर्दी-खोकला झाल्यास किंवा शिंकताना-खोकताना स्वच्छ रुमालाचा वापर करावा, टिश्यू वापरल्यास तो तत्काळ बंद कचऱ्याच्या डब्यात टाकावा. दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान ३ फुटांचे अंतर असावे, गरज पडल्यास बैठक व्यवस्था बदलावी.कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क अनिवार्य असणार आहे. कार्यालयातील सर्व कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर दिवसातून दोन वेळा स्वच्छ पुसून घेणे, ७० टक्के अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करावे. कार्यालये नियमितपणे धुवून घ्यावीत, त्यासाठी सफाई कामगारांनी ग्लोव्ह्ज, रबर बूट, ट्रिपल लेअरचा मास्क वापरावा, वापरानांतर या वस्तूंची बायोमेडिकल वेस्टच्या नियमांनुसार विल्हेवाट लावावी. वारंवार वापरात येणाऱ्या वस्तू जसे लिफ्टचे बटन, बेल, टेबल-खुर्च्या व कार्यालयातील इयर उपकरणं दिवसातून तीन वेळा २ टक्के सोडियम हायपोक्लोराइट सोल्युशनने स्वच्छ पुसून घेणे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सुविधा तसेच प्रत्येक स्वच्छतागृहात साबण, हँडवॉशची व्यवस्था करावी. तसेच या सर्व मार्गदर्शक सूचना दर्शनिय ठिकाणी लावण्याचे देखील सांगण्यात आले आहे.

 

कार्यालयीन बैठका प्रत्यक्ष बैठक खोलीत न घेता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा. कर्मचाऱ्यांनी कर्यालयात एकत्र बसणे, एकत्र डबा खाणे तसेच एकाच ठिकाणी जमा होणे टाळावे, त्यासाठी आदेश काढावेत. एकच काम अनेक व्यक्तींना करणे आवश्यक असल्यास २-३ लोकांचा गट करणे, कारण जंतुसंसर्ग झाल्यास फक्त त्यांच गटाचे अलगिकरण होईल.एकाच वाहनातून अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रवास करु नये. ई-ऑफिसचा जास्तीत जास्त वापर करावा, फाईल्स ई-मेलद्वारे पाठवाव्यात. बाहेरील कमीत कमी लोकांना कार्यालयात प्रवेश द्यावा, या सर्वांची थर्मल स्क्रिनिंग करावी. यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्यास, निर्जंतुकीकरण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

Protected Content