सीसीआय केंद्रावरील कापूस खरेदीचा वेग वाढवा ; शेतकऱ्यांची मागणी

 

शेंदुर्णी, प्रतिनिधी | जामनेर तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. सीसीआय केंद्रावर कापूस विकण्यासाठी जवळपास सात हजार शेतकऱ्यांनी नावे नोंदलेली असतांना केवळ ५०० शेतकऱ्यांचे कापूस घेण्यात आला आहे. या धीम्या गतीमुळे पैश्या अभावी शेती मशागत व पेरणी खोळंबनार असल्याने जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

खुल्या बाजारात चार हजाराच्या आसपास प्रतीक्विंटल भाव कापसाला मिळत आहे. सीसीआयमध्ये मात्र ५४०० शे रुपये ते पाच हजार भाव मिळत असल्याने तेथे कापूस विकण्यासाठी जवळपास सात हजार शेतकऱ्यांनी नावे नोंदलेली आहे. मात्र आज पावेतो ५०० शेतकऱ्यांचा कापूस घेण्यात आलेला आहे अजूनही नाव नोंदणी सुरूच आहे. सदर बाब ही अत्यंत काळजीची असून जिल्हाधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जामनेर तालुक्यात सध्या जामनेर व शेंदुर्णी या दोनच ठिकाणी कापूस खाली केला जात आहे. तोंडावर पावसाळा असल्याने मे महिना अखेरीस कापूस खरेदी बंद होईल. याकरता जिल्हाधिकारी यांनी जामनेर व पहूर येथील जिनिंग अधिग्रहित करून तेथेही कापूस खरेदी जिनिंगमध्येही पूर्ण क्षमतेने दररोज ३५ ते ४० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात आहे. मे महिना अखेर कापूस खरेदी मुदत आहे. पण ही मुदत वाढवून पाऊस पडेपर्यंत कापूस खरेदीस मुभा द्यावी. बाजार समितीने कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादी लावून सार्वजनिक करावी जेणेकरून यादीनुसारच वाहने मोजली जात आहे. अशी खात्री करून घेता येईल अशीही मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. दोन आठवड्यापूर्वी शेंदुर्णी येथे बाजार समितीचे पदाधिकारी राजकीय नेते व शेतकरी यांची बैठक पार पडली. मात्र काही निष्पन्न न झाल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. त्यातही कापूस मोजल्यानंतर दोन आठवडे शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबलेली आहे. याबाबत शेंदुर्णी येथील केंद्र प्रमुख पाटील यांना विचारणा केली असता सदर कापूस खरेदी शासनाच्या फिजिकल डिस्टन्स च्या नियमानुसार असल्याने जास्त वाहने खाली करता येणे शक्य नाही. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व आगामी पावसाळ्याच्या वातावरणामुळे कामकाज केव्हाही ठप्प होऊ शकते. ह्या कारणाने जास्त कापूस खरेदी करून साठविता येणे शक्य नाही असे सांगितले. जामनेर तालुक्यातील कापूस उत्पादकांची होणारी वाताहताबाबत जामनेर बाजार समितीचे प्रभारी सचिव प्रसाद पाटील यांनी सांगितले की, सीसीआय व जिनिंग मालक यांनी सहकार्य केल्यास पावसाळ्यातही टप्प्याटप्प्याने कापूस खरेदी सुरू ठेवता येईल. पहूरचे केंद्र सुरू करण्यासाठी सीसीआयचे औरंगाबाद कार्यालयाला विनंती केलेली आहे. परवानगी मिळाल्यास तिथेही कापूस खरेदी सुरू होऊ शकते. सदर ७००० शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादी कायम ठेवून ऑक्टोंबरमध्ये सीसीआय सुरू झाल्यास प्राधान्यक्रम सदर यादीला दिल्या जाईल. शेंदुर्णीला कापूस ट्रॅक्टरची संख्या वाढवता येणे शक्य आहे.

Protected Content