आशा वर्कर, गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आ. चव्हाण यांना निवेदन

चाळीसगाव, प्रतिनिधी । ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील आशा सेविका – गटप्रवर्तक व अंगणवाडी कर्मचारी यांना २५ लाखांचे विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा तसेच ग्रामीण व शहरी भागातील आशा सेविका व गटप्रवर्तक व अंगणवाडी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या शिष्टमंळाने आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले.

आमदार मंगेश चव्हाण शिस्टमंडळाच्या मागण्या समजून घेत तत्काळ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व महिला बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर यांना मागण्यांचे पत्र देत तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली. तसेच इतर प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक लावण्यासाठी देखील पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रात पुढील बाबींकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागात होम टू होम संपर्क असणारा महत्वाचा घटक म्हणून अंगणवाडी व आशा कर्मचारी यांचे मोठे काम आहे. मात्र, या कोरोनायोद्धयांच्या बाबतीत शासनाने शहरी व ग्रामीण असा भेदभाव करत शहरी भागातील आशा सेविका – गटप्रवर्तक व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना २५ लाख रुपये विमा संरक्षण व १ हजार रुपये प्रतिमहिना प्रोत्साहन भत्ता या लाभापासून वंचित ठेवले आहे. यामुळे शहरी भागातील अंगणवाडी कर्मचारी व आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्यामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. मुळात घटक हे अतिशय अल्प मानधनात दिवसाला किमान ६ तास काम करीत असतात तसेच त्यांना सुट्टी व इतर शासकीय कर्मचारी यांच्याप्रमाणे भत्ते व सोयी सुविधा देखील नसतात. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सप्टेंबर २०१९ मध्ये आशा सेविकांचे मानधन १५०० + इनसेंटीव्ह वरून २००० + इनसेंटीव्ह करण्यात आले मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यांची अद्यापपर्यंत अंमलबजावणी न केल्याने याचा मोठा फटका आशा सेविकांना बसत आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता पुढील वर्षभर चालणाऱ्या कोरोना संकटाच्या काळात आशा सेविका – गट प्रवर्तक व अंगणवाडी कर्मचारी या कोरोना योद्धयांचे मनोधैर्य खचू नये यासाठी त्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. शिष्टमंडळात रामकृष्ण पाटील यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकारी साधना पाटील, माया पाटील, प्रियतमा पाटील ,सुनंदा नेरकर ,शारदा पाटील, आशा वर्कर -अनिता चौधरी, भारती चौधरी, आशा सोनकांबळे, जयश्री आगोणे यांचा समावेश होता.

Protected Content