जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर; पुन्हा सात नवीन रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । आज रात्रीच्या रिपोर्टमध्ये सात रूग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली असून यामुळे जिल्ह्यातील रूग्णांची संख्या १९० इतकी झाली आहे. दरम्यान, प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत असले तरी कोरोनाचे रूग्ण वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांबाबतची ताजी माहिती दिली आहे. यानुसार-जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या 39 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 32 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सात व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा एक, जळगाव दोन तर भुसावळच्या चार रूग्णांचा समावेश आहे. यामध्ये पाचोरा येथील 21 वर्षीय तरूणाचा, जळगाव शहरातील शांतीनगर येथील 51 वर्षीय व श्रीराम नगरातील 63 वर्षीय पुरूषाचा तर भुसावळ येथील 58, 60, 70 वर्षीय पुरूषांचा तर 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच अमळनेर येथील यापूर्वीच कोरोना बाधित आढळून आलेल्या एका 58 वर्षीय पुरूषाचा 14 दिवसानंतरचा तपासणी अहवालही पाॅझिटिव्ह आला आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 190 इतकी झाली असून त्यापैकी पंचवीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकोणतीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाने शहरात अनेक उपाययोजना केल्या. आता सध्या कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तथापि, इतके करूनही संसर्ग कमी होत नसल्याने प्रशासनकीय उपाययोजनांवर प्रश्‍नचिन्ह लागले आहे.

Protected Content