मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देताना पाळण्यात येणाऱ्या नियमांमध्ये केंद्र सरकारने बदल केले आहेत. त्यानुसार आता राज्यातही कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
नव्या नियमांनुसार, एखाद्या रुग्णामध्ये अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोनाच्या रूग्णासाठी सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशीही ताप नसल्यास त्याला दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्यात यावे. तसेच डिस्चार्जनंतर या संबंधित रूग्णास ७ दिवस होम क्वारंटाईन गरजेचे राहिल. या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्या हातावर ७ दिवसांचा स्टॅम्प मारण्यात मारावा. त्याचप्रमाणे डिस्चार्ज देण्यापूर्वी ऑक्सीजनचे प्रमाण ९५ टक्के पेक्षा कमी आढळल्यास तर त्या ‘डेडिकेटेड कोविड सेंटर’मध्ये दाखल करण्यात यावे. ऑक्सिजनचे प्रमाण ९५ टक्के पेक्षा जास्त असेल अशांना लक्षणे सुरु झाल्यापासून १० दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात यावा. या रुग्णांना डिस्चार्ज करतांना पुन्हा कोरोना चाचणीची गरज नाही. तसेच डिस्चार्जनंतर सात दिवस होम क्वारंटाईन करावे, असे या नियमावलीमध्ये म्हटले आहे. दरम्यान, कोविड १९ च्या रुग्णांचं आजाराच्या स्तरानुसार वर्गीकरण करुन वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील. आतापर्यंत संसर्ग उघड झाल्यानंतर प्रथम १४ दिवसांनी आणि नंतर २४ दिवसांनी, चाचणी नकारात्मक आली तरच रुग्णाला डिस्चार्ज मिळत होता. सुधारित दिशानिर्देशांनुसार सौम्य लक्षणं दाखवणाऱ्या रुग्णांना ३ दिवसात ताप उतरला आणि ९५ टक्के श्वासोच्छ्वास नियमित राहिला तर १० दिवसात घरी सोडले जाणार आहे. अगदी त्यासाठी वेगळ्या चाचणीची गरज असणार नाही.