डोंबिवली रिटर्न : वेगळ्या अनुभवाचे ‘रिटर्न तिकीट’ ( चित्रपट समीक्षा )

मध्यमवर्गीय, सामान्य माणुस, सरळ स्वभावाचा एका मार्गाने जाणारा, अत्यंत पापभिरू, अश्या सरळ-साधेपणाने जीवन जगणार्‍या व्यक्तीच्या आयुष्यात जर काही मोहाचे प्रसंग आले तर त्याची मानसिकता कशी होईल, कोणत्या संकटाला त्याला सामोरे जावे लागेल, अशा कल्पनेवर आधारित ‘डोंबिवली रिटर्न’ ह्या सिनेमाची निर्मिती कॅरंबोला क्रियेशन्सने केली आहे. याचे निर्माते संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमीत सिंग, कपिल झवेरी असून कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन महेंद्र तेरेदेसाई यांचे आहे. छायाचित्रण उदयसिंग मोहिते, संगीत शैलेंद्र बर्वे, गीते चंद्रशेखर सानेकर, मुकुंद सोनावणे यांची असून यामध्ये संदीप कुलकर्णी, राजेश्‍वरी सचदेव, ऋषिकेश जोशी, अमोल पराशर, सिया पाटील, तृषनिका शिंदे या कलाकारांनी भूमिका साकारलेल्या आहेत.

एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचे जीवन जगणारा अनंत वेलणकर ह्याची कथा ह्या सिनेमात मांडली आहे. त्याचे डोंबिवली मध्ये एक लहानसे घर आहे, त्याच्या सोबत त्याची बायको उज्वला आणि मुलगी अंतरा हे राहत असतात. त्याला श्रीधर नावाचा लहान भाऊ आहे. असा त्यांचा सुखी परिवार असून, अनंत वेलणकर हे मंत्रालय मध्ये जनसंपर्क विभागात कामाला असतात. आपली नोकरी प्रामाणिकपणे करायची, नियमितपणे कामावर जायचे, आणि काम संपले की डोंबिवली लोकलने घरी यायचे हा त्यांचा दिनक्रम असतो. एक दिवस नोकरीवर गेले असतांना गोकुळाष्टमी च्या दही हंडीच्या दिवशी झालेल्या दहीहंडी फोडण्याचे काही फोटोग्राफ पेन ड्राईव्ह मधून त्याचा मित्र त्याच्या कडे पाठवतो. अनंत वेलणकर ते फोटो पाहत असतांना एका फोटोवर येऊन त्याची नजर स्थिरावते आणि त्याच्या मनाचा तोल जातो. त्या फोटोत दादासाहेब नावाची मोठी प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती कोणा एका माणसाचा खून करताना बघत असतात. ही घटना दादासाहेब ह्यांच्याच घरात घडत असते. दादासाहेब हे वेलणकर यांचे दैवत असते. तो त्यांना आदर्श व्यक्ती म्हणून मानत असतो, वेलणकर ही सारी घटना त्यांना पेन ड्राईव्ह च्या माध्यमातून दाखवतो. ह्या बदल्यात दादासाहेब त्याला पैसे, घर वगैरे देण्याचे ठरवतात. वेलणकर सरळ मार्गी असल्याने तो त्यातील काहीच घेत नाही, त्याच्या प्रामाणिकपणाचा दादासाहेबांना त्रास होतो, वेलणकर वर नजर ठेवली जाते. येनकेन प्रकाराने त्याला कुठे ना कुठे तरी अडकवायचे असे ते ठरवून त्याच्या समोर अचानक पैसे स्वीकारण्याची संधी कशी येईल त्याची ते योजना आखतात, आणि त्या मध्ये वेलणकर अडकतो की नाही हे सिनेमा पाहून आपल्याला कळू शकते.

वेलणकर त्याच्या समोर आलेली संधी तो घेतो का ? त्यामुळे त्याची मानसिक स्थिती कशी होते ? लोकल ट्रेन मधून प्रवास करताना त्याला कशाचे विचित्र भास होत असतात ? त्याची बायको उज्वला, मुलगी अंतरा तिचे काय होते ? कश्यामुळे होते ? अश्या अनेक भावनिक आणि मानसिक प्रश्‍नांची उत्तरे सिनेमात मिळतील. हे सारे अनुभवण्यासाठी डोंबिवली रिटर्न पहायला पाहिजे. पैसा हे तुमच्या सर्व दुःखाचे मूळ आहे, हातामध्ये सत्ता आणि पैसा आला कि मोठमोठया व्यक्तींची मती गुंग होते. सरळ मार्गात अचानक लॉटरीचा पैसा आला की जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. लोभामुळे नाश होतो, त्यावर नियंत्रण ठेवायला हवे अशा संदेश हा सिनेमा कळत न कळत देऊन जातो.

संदीप कुलकर्णी यांनी अनंत वेलणकर ची भूमिका त्यामधील बारीक-सारीक बारकाव्या सह सुरेख सादर केली आहे. पैसा नसताना आणि पैसा मिळाल्यावर ची मानसिकता कशी बदलते हे त्यांनी सुरेख दाखवले आहे, सोबत राजेश्‍वरी सचदेव, अमोल पराशर, तृशनिका शिंदे, ऋषिकेश जोशी यांची सुरेख साथ लाभली आहे. तांत्रिक दृष्ट्या सिनेमा छान आहे. महेंद्र तेरेदेसाई यांनी कथा-संवाद- दिग्दर्शन मनाचा ठाव घेते. प्रेक्षक त्यामध्ये गुंतत जातो. एक वेगळ्या अनुभवाचा हा सिनेमा आहे.

दीनानाथ घारपुरे, मुंबई ( ९९३०११२९९७ )

Add Comment

Protected Content