चाळीसगाव प्रतिनिधी । येथील रहिवासी असणार्या भिक्षेकर्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बँक अकाऊंटमध्ये सुमारे १२ लाखांची रक्कम असल्याची आढळून आली असून आता मृत्यूनंतर अनेक जण त्यावर दावा सांगू लागले आहेत.
चाळीसगाव ते धुळे रेल्वेत झाडू मारून भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारा शहरातील हनुमान वाडीतील ६० वर्षीय इसमाचा धुळे शासकीय रुग्णालयात दि २९ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला मात्र त्याच्या बँक खात्यात चक्क ५ लाख ४० हजार रुपये रोख व फिक्स डिपॉझिट असे मिळून जवळपास १२ लाखाची रक्कम असल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील हनुमान वाडीत इंदलसिंग फुलचंद ठाकूर (६०) हे गेल्या अनेक वर्षांपासून चाळीसगाव येथील हनुमान वाडीत एकटेच राहत होते. ते रेल्वे गाड्या तसेच धुळे चाळीसगाव रेल्वेत झाडू मारून भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असत त्यांना धुळे शासकीय रुग्णालयात बेवारस दाखल केल्याने त्यांचा दि २९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मृत्यू झाला होता. याची माहिती धुळे पोलिसांनी चाळीसगाव पोलिसांना कळवून शोध घेण्याची आवाहन केल्यावर शहर पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोपाल भोई यांनी माहिती काढून शोध घेतला असता त्यांच्या घरात सापडलेल्या कागदपत्रावरून ते इंदलसिंग फुलचंद ठाकूर (६०) असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पोलिसांनी त्यांचे बँक पासबुक तपासले असता त्यांच्या खात्यावर चक्क ५ लाख ४७ हजार रूपये रोख व फिक्स डिपॉझिट असे १२ लाख रुपये असल्याचे उघड झाले असून त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याप्रकरणी धुळे शासकीय रुग्णालयाचे सफाई कामगार देविदास चावरे यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस नाईक गोपाल भोई करीत आहेत.
दरम्यान, इंदलसिंग ठाकूर यांना जीवंतपणी कुणी विचारत नसले तरी आता मृत्यूनंतर त्यांच्या पैशांवर दावा सांगण्यासाठी काही आप्तजन समोर आल्याने याबाबत एकच चर्चा सुरू झाली आहे.