मोदींचा जन्म भारतात झाल्याने त्यांना नागरिकत्व दाखल्यांची आवश्यकता नाही : पीएमओ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म भारतात झाल्याने त्यांना नागरिकत्व दाखल्यांची आवश्यकता नसल्याचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने माहिती अधिकाराच्या अंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर दिले आहे. एनआरसी लागू झाल्यास अनेकांचे नागरिकत्व जाईल, अशी भीती व्यक्त केली जातेय. याच पार्श्वभूमीवर शुभांकर सरकार यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या नागरिकत्वाबद्दलचा तपशील मागितला होता.

 

द क्विंट या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, शुभांकर सरकार यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या नागरिकत्वाबद्दलचा तपशील मागितला होता. त्यावर नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ३ अंतर्गत पंतप्रधान मोदी जन्माने भारतीय आहेत. त्या आधारे ते भारतीय ठरतात. त्यामुळे त्यांच्या नागरिकत्व दाखल्यांचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने दिले आहे. नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ३ मध्ये भारतीय नागरिकत्वाचा उल्लेख आहे. यानुसार उपकलम २ सोडून प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे. त्यामुळे २६ जानेवारी १९५० ते १ जुलै १९८७ दरम्यान भारतात जन्मलेली व्यक्ती भारतीय ठरते. १ जुलै १९८७ पासून नागरिकत्व संशोधन कायदा २००३ लागू होईपर्यंत भारतात जन्मलेली किंवा आई-वडिलांपैकी कोणीही भारतीय असलेली व्यक्ती भारतीय ठरते. नागरिकत्व संशोधन कायदा २००३ लागू झाल्यानंतर मात्र यात थोडा बदल होतो. २००३ नंतर जन्मलेल्या व्यक्तीचे आई-वडील भारतीय असल्यास ती व्यक्ती भारतीय नागरिक ठरते. या व्यक्तीच्या आई-वडिलांपैकी एकही जण अवैध प्रवासी असल्यास ती भारतीय नागरिक ठरत नाही.

Protected Content