मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात पाच ठार

पुणे वृत्तसंस्था । मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून एक्स्प्रेस वे कडे जाणाऱ्या अंडा पॉइंटवर आयशर ट्रकने तीन बाइकना चिरडल्याची भयंकर घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील सर्व प्रवासी हे तळेगाव एमआयडीसीमध्ये काम करणारे होते. तीन मोटारसायलकर घेऊन ते अलिबागला फिरण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना खोपोली बोर घाटातील अंडा पॉइंट येथे लघवीला थांबले होते. त्याचवेळी पुण्याकडून येणारा आयशर ट्रक (क्र. एमएच 46 बीब 1830) उलटून या तीन मोटारसायकवर आदळला. त्यात चौघे जागीच ठार झाले. तर, एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी बालाजी हरिसचंद्र भंडारे (३५) हा गृहस्थ लघवीसाठी बाजूला गेल्याने बचावला. अपघातग्रस्त मोटारसायकलचे क्रमांक अनुक्रमे (एमएच 14 सीव्ही 0243, एमएच 14 एफके 4097 आणि एमएच 14 एमएच 5793) असे आहेत. अपघातातील सर्व मृत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील वंजारवाडीचे आहेत. सध्या ते तळेगावातील वराळे फाटा येथे राहत होते.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस अधिकारी, कर्मचारी, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस, आयआरबीचं देवदूत पथक घटनास्थळी धावलं. त्यांनी अपघातग्रस्तांना ट्रकच्या खालून काढून खोपोली नगरपालिकेच्या दवाखान्यात दाखल केले. अपघातानंतर काही काळ विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे.

Protected Content