मुंबई वृत्तसंस्था । कोरोना आटोक्यात आल्यानंतर राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयानंतर ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांनी एक डिसेंबरपासून शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षानंतर राज्यात पहिली ते सातवीचे वर्ग उद्यापासून सुरू होणार आहेत. कोरोनाचे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांची काळजी घेणार असल्याचे शाळा व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे. सर्व शाळांनी याबाबत सर्व तयारी केली आहे. शिक्षक आता प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत.
दरम्यान मुंबई महापालिकेने १५ डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आज झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरातील शाळा सुरू होणार नाहीत. ग्रामीण भागातील शाळा सुरू उद्यापासून सुरू होणार आहेत. औरंगाबादच्या ग्रामीण भागातील शाळा उद्यापासून सुरू करणार असल्याची माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. औरंगाबाद शहरातील शाळांबाबतचा निर्णय १० डिसेंबरनंतर परिस्थिती पाहून घेण्यात येईल असे मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी सांगितले.