सोमवारपासून चोपड्याच्या पुरातन श्री बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा

jirnoddhar

चोपडा प्रतिनिधी । शहराच्या सांस्कृतिक मिरासदारीत भर घालणार्‍या श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या श्री बालाजी मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा दि.२४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष विठ्ठलदास छगनलाल गुजराथी यांनी दिली.

शहराच्या मध्यवर्ती भागात पुरातन गोलमंदिराजवळ श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचे सुमारे चारशे वर्षे पुरातन बालाजी मंदिर अस्तित्वात होते.संस्थानचे अध्यक्ष विठ्ठलदास छगनलाल गुजराथी व विश्‍वस्तांनी या जुन्या मंदिराचा निर्णय घेवून अद्यावत सुंदर आणि पवित्रता निर्माण होईल असे श्री.बालाजींचे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला.स्थानिक व तिरुपती बालाजी परिसरातील कारागिरांनी जीव ओतून उत्तम असे कोरीव काम केलेले विशाल मंदिर निर्माण केले आहे.या मंदिरामुळे परंपरेच्या इतिहासात नक्कीच भर पडणार आहे.

या सोहळ्यात दि.२४ रोजी सकाळी ९ वाजता गुजराथी वाडीपासून डॅा.हेडगेवार चौक,राणी लक्ष्मीबाई चौक,गांधी चौक,मेनरोड मार्गाने श्री.बालाजींच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात येणार असून मंदिराजवळ समारोप होईल.त्यानंतर पूजाविधींना प्रारंभ त्यात गणेश स्थापना,पीठ स्थापना करण्यात येईल.दुपारी १ ते ७ वाजे दरम्यान पुष्पोत्सव होणार आहे. दि.२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून प्रासाद शुध्दीकरण,यज्ञकर्म पार पडतील. तसेच रात्री ८ ते १० पं.विश्‍वनाथ दाशरथे(संभाजीनगर) यांचा भक्ती रस धारा कार्यक्रम होणार आहे. दि.२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून पुजन,यज्ञकर्म,कलश ध्वजारोहण,प्राण प्रतिष्ठा व पुर्णाहुती कार्यक्रम होतील.त्यानंतर भाविकांना प्रसाद वितरण केले जाणार आहे.सायंकाळी ५ वाजता विष्णू सहस्त्रनाम पठण होणार आहे.

या कार्यक्रमांना चोपडा तालुका व परिसरातील श्री.बालाजी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देण्याचे आवाहन अध्यक्ष विठ्ठलदास गुजराथी, विश्‍वस्त विनोद हुंडीवाले,आनंदराव देशमुख, प्रवीण गोपालदास गुजराथी, विक्रमसिंह देशमुख व प्रविणभाई गुजराथी व श्री व्यंकटेश बालाजी संस्थान जीर्णोद्धार समिती यांनी केले आहे.

Protected Content