Home Cities चोपडा अडावदमध्ये ‘बारागाड्यां’चा पारंपरिक सोहळा उत्साहात; भाविकांची मोठी गर्दी

अडावदमध्ये ‘बारागाड्यां’चा पारंपरिक सोहळा उत्साहात; भाविकांची मोठी गर्दी


अडावद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अडावद येथे अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केला जाणारा पारंपरिक ‘बारा गाड्या’ ओढण्याचा सोहळा यावर्षीही अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. ‘खंडेराव महाराज की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

संध्याकाळी सहाच्या सुमारास अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाच्या पुलाजवळून ग्रामपंचायतीपर्यंत हा सोहळा पार पडला. यावेळी हा अद्भुत क्षण पाहण्यासाठी हजारो भाविक आणि अबालवृद्धांची मोठी गर्दी झाली होती. यावर्षी गाड्या ओढण्याचा बहुमान समाधान सुका पाटील यांना मिळाला, तर सुवासिन होण्याचा मान ठेलारी काशिनाथ कोळपे यांच्या वाड्यातील नंदनी शामराव माने यांना मिळाला.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महारू पाटील, सुनील पाटील, दिलीप पाटील, रमेश धनगर यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक युवकांनी मोलाची कामगिरी केली. तरुणांचा उत्साह आणि ग्रामस्थांचे नियोजन वाखाणण्याजोगे होते. कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा शांततेत पार पडला. गावोगावच्या भाविकांनी या पारंपरिक सोहळ्याला हजेरी लावून परंपरेचे जतन केल्याचे दिसून आले.


Protected Content

Play sound