बुलढाणा प्रतिनिधी । जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्याप्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी येत असून त्यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई करत नियंत्रण मिळवावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात कुठेही अवैध गुटखा विक्री, गुटखा वाहतूक, दारूविक्री, दारू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती पालकमंत्री यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क करून द्यावी, असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले आहे. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
अवैध धंद्यामधील गांजा विक्री, वरली मटका खेळणे, जुगार खेळणे आदी प्रकारही होत असल्याचे आढळून आल्यास याचीही माहिती द्यावी. पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवून वचक निर्माण करावा, यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.