नवी दिल्ली । काँग्रेस उमेदवार तरविंदर सिंह मारवाह यांनी पाकमध्ये जाऊन हिंदूस्थान जिंदाबाद असा नारा दिला होता….भाजपकडे असा एक तरी नेता आहे का ? असा प्रश्न राहूल गांधी यांनी विचारला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून सातत्याने पाकिस्तानचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर आता काँग्रेसने देखील पाकिस्तानवरून भाजपला टोला लगावला आहे. याला राहूल गांधी यांनी एका सभेत जोरदार उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस उमेदवार तरविंदर सिंह मारवाह यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले की, भाजप नेते देशभक्तीच्या गप्पा मारतात. पाकिस्तानचे नाव घेतात. मात्र तरविंदर सिंह मारवाह असे नेते आहे ज्यांनी पाकिस्तानमध्ये जावून हिंदुस्तान जिंदाबादचे नारे लगावले होते. पाकिस्तानात त्यांना अटकही करण्यात आली होती. भाजपकडे एकतरी नेता आहे का, ज्याने पाकिस्तानमध्ये जावून हिंदुस्तान जिंदाबादचे नारे लावले, असा सवालही राहुल यांनी उपस्थित केला.
राहूल गांधी पुढे म्हणाले की, मागील पाच वर्षात देशातील लोक एकमेकांचा तिरस्कार करायला लागले आहेत. हा आपला इतिहास नाही. भाजपवाले हिंदु, मुस्लीम, शिख धर्मांची गोष्ट करतात. मात्र त्यांना कोणताही धर्म समजत नाही. वास्तविक पाहता हिंदू धर्मात सर्वांना घेऊन पुढे जाण्याची शिकवण आहे. मात्र भाजप आणि आम आदमी पक्षाकडून लोकांच्या मनात तिरस्कार भरवण्यात येत असल्याचा आरोप राहुल यांनी यावेळी केली.