तरूणाला चिरडल्यानंतर संतप्त मन्यारखेडाकरांचा ‘रास्ता रोको’

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मन्यारखेडा येथील एका युवकाला कंटेनरने चिरडल्यानंतर पोलिसांच्या बेपवाईने संतप्त झालेल्या नागरिकांनी महामार्गावर ‘रास्ता रोको’ केल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाल्याची घटना रात्री घडली.

याबाबत वृत्त असे की, दगडू उर्फ बाळू देवीदास पाटील (वय ३८, रा. मन्यारखेडा, ता. जळगाव) हा तरूण कालींका माता मंदिर परिसरातील एका हातगाडीवर काम करतो. काम आटोपून तो रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीने घरी येत असतांना दुरदर्शन टॉवरजवळ त्याला एका कंटेनरने उडविल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील हे नशिराबादला जातांना त्यांना हा अपघात दिसल्याने त्यांनी लागलीच पोलीसांना फोन लावला. मात्र येथे पोलीस येण्यासाठी विलंब झाला. येथे दोन पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी मृतदेह हलविण्याऐवजी हद्दीवरून भांडण सुरू केले. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको सुरू केला. परिणामी राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंनी लांबलचक रांगा लागल्या. अखेर रात्री बारानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, ग्रामस्थांनी पोलीसांच्या असंवेदनशीलतेचा तीव्र धिक्कार केला.

Protected Content