गुटखा माफियांवर मोक्का लावण्याचा विचार- अजित पवार

ajit pawar

मुंबई प्रतिनिधी। गुटखाबंदी असतानाही याची विक्री करणार्‍यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यासंदर्भात उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. याप्रसंगी अजित पवार म्हणाले की, यापूर्वी राज्यात गुटखाबंदी लागू करण्यात आली, त्याची कडक अंमलबजावणीही झाली. त्यामुळे गुटखा कंपन्या राज्याबाहेर गेल्या. अलीकडच्या काळात परराज्यांच्या सीमेवरुन मोठ्या प्रमाणावर गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांची राज्यात आयात केली जाते. त्यांची राज्यात साठवणूक होते. कधीकधी हा माल पकडलाही जातो व वाहनचालकांवर कारवाई होते. परंतु सूत्रधारांना धक्का लागत नाही. गुटखा माफियांवर वचक निर्माण होत नाही. यापुढच्या काळात राज्यात गुटखाबंदीची राज्यात कडक अंमलबजावणी होईल. त्यासाठी या व्यापारातील सूत्रधारांना मोक्का लावून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करण्यात येईल. अन्न व औषध प्रशासन, पोलिस व परिवहन विभागाचे अधिकारी समन्वयाने कारवाई करतील. गुटखाविक्रीला संरक्षण देताना जे अधिकारी आढळतील त्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी दिला. गुटखाबंदी विरोधात जिल्हा स्तरावर विविध विभागांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ापुढच्या काळात गुटखाविक्रीच्या अवैध व्यवसायात असलेल्या कंपन्यांच्या मालकांना व मुख्य सूत्रधारांना शोधून थेट त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याने शालेय विद्यार्थी, व तरुण गुटख्याच्या दुष्परिणामापासून वाचतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Protected Content