…तरच मनसेशी युती शक्य – फडणवीस

Raj Thackeray Devendra Fadnavis

मुंबई, वृत्तसंस्था | सध्या राज्याच्या राजकारणात एका नव्या समीकरणाची चर्चा सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपासोबत युती करण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेटही झाल्याचे कळले आहे. दुसरीकडे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही राज ठाकरे भाजपासोबत जाऊ शकतात, असे संकेत दिले होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना आपली भेटच झाली नसल्याचा दावा केला आहे. मात्र यावेळी त्यांनी भविष्यात मनसे आणि भाजपा एकत्र येऊ शकते, असे संकेतही दिले आहेत.

 

राज ठाकरेंसोबत बैठक झाली का असे विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या भेटी अनेक वेळा झाल्या आहेत असे सांगत उत्तर देणे टाळले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “मनसे आणि भाजपा एकत्र येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यांच्या आणि आमच्या विचारात मोठे अंतर आहे आणि जोपर्यंत विचार आणि कार्यपद्धतीत अंतर आहे तोपर्यंत आम्ही एकत्र येऊ शकत नाही. त्यांचे विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात विचार करु शकतो”.

“आज तरी सध्या अशी कोणतीच शक्यता नाही. आमचा व्यापक दृष्टीकोन आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने सर्व घटकपक्षांना एकत्र घेऊन पुढे जायचे आहे. त्यामुळे आज तरी अशी परिस्थिती दिसत नाही. भविष्यात ते व्यापक विचाराने चालणार असतील तर त्यावेळी विचार केला जाईल,” असे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Protected Content