मुंबई, ठाणे आणि कोकणात रेड अलर्ट ; १३०० नागरिक सुरक्षित स्थळी रवाना

001 1567585788

मुंबई (वृत्तसंस्था) पुढील २४ तासात हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांती नगर पाण्याखाली गेल्यामुळे एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य हाती घेत आतापर्यंत १३०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविलं आहे.

 

हवामान विभागाकडून सकाळी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र काही काळाने तो वाढवून आता रेड अलर्ट देण्यात आला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाची स्थिती लक्षात घेत मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली. तसेच सकाळच्या सत्रातील शाळेतले विद्यार्थी सुखरुप घरी पोहोचतील याची खबरदारी शाळांनी घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. तसेच गरज असेल तरच घराबाबेर पडण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

 

मुंबई आणि उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नदीकाठावरील भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांती नगर पुन्हा पाण्याखाली गेलं आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर नदीचे पाणी वस्तीत घुसण्याची शक्यता असून, मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. मुंबई महापालिका आणि एनडीआरएफचं पथक या भागात पोहोचलं असून, बचावकार्य हाती घेतलं आहे. एनडीआरएफच्या जवानांनी आतापर्यंत १३०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.

Protected Content